खनिज वाहून नेणाऱ्या जड वाहनांच्या मार्गावर एक महिला खाणीचे अवशेष आणि चिनीमातीच्या ढिगाऱ्याजवळून जात आहे. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.
चिनीमातीची खाण कशी सुरू झाली?
एका सामुदायिक विकास योजनेचा भाग म्हणून राज्यधरपूर, खोरिया आणि कोमरपूर या तीन गावांमधून पटेलनगरचे खाण उपनगर १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात स्थापन करण्यात आले होते. १९६१ च्या जिल्हा जनगणनेच्या पुस्तिकेमध्ये असेही म्हटले आहे की अनेक टाक्या, जुन्या इमारती आणि मशिदींचे अस्तित्व या क्षेत्राच्या भूतकाळातील समृद्धीची साक्ष देते. २०११ च्या जनगणनेनुसार या गावांची एकत्रित लोकसंख्या ७००० पेक्षा जास्त होती.
उद्योगांमुळे उत्पन्नाच्या इतर संधीही उपलब्ध झाल्या – स्त्रिया चित्रकलेसाठी खूप मागणी असलेल्या चिनीमातीच्या पावडरच्या वड्या (केक) बनवायला शिकल्या, काही तरुण मोटर मेकॅनिक बनले, काही चिनीमाती पावडर आणि वड्यांचे (केकचे) पुरवठादार बनले.
परंतु लँडस्केपवरील संशोधनासंदर्भात या भागाला अनेकवेळा भेटी देणाऱ्या बीरभूम येथील विश्वभारती विद्यापीठातील चित्रकलेचे सहयोगी प्राध्यापक संचयन घोष यांच्या मते, येथे आश्वासन देऊनही शहरीकरण कधीच झाले नाही.
उपनगर अस्तित्वात आल्यानंतर रजनी सिनेमा या चित्रपटगृहाचे काम सुरू झाले परंतु ते काही दशकांपूर्वी बंद पडले, आता निर्मनुष्य असणाऱ्या क्वार्टर्स एकेकाळी तिथे लोकांची वस्ती होती याची आठवण करून देतात.
“उत्सर्जक धूळ शोषून घेण्यासाठी किंवा साठवून ठेवण्यासाठी आज तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्यामुळे धूळ आजूबाजूला पसरण्यापासून रोखली जाते, परंतु तेथे अशी कोणतीही पायाभूत सुविधा दिसत नाही. तथापि, स्थानिक लोकांच्या संमिश्र भावना आहेत कारण ते देखील उत्पन्नासाठी उद्योगांवर अवलंबून आहेत,” घोष यांनी मोंगाबे-इंडियाला स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील खारिया गावात चिनीमाती प्रक्रिया युनिटजवळ मुले गोळा झाली आहेत. चिनीमातीच्या स्थानिक नावावरून, म्हणजेच ‘खोरी’वरून, या गावाला नाव मिळाले आहे. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.
उदाहरणार्थ, कोमरपूरचे रहिवासी शांतो दास हे उद्योगांचे अप्रत्यक्ष लाभार्थी आहेत – ते ग्राइंडर प्लांटमधून चायना क्ले पावडर रु. २०००/- रु. २२००/- प्रति टन या दराने विकत घेतात आणि स्थानिक महिलांना चिनिमातीच्या वड्या (केक) बनवण्यासाठी देतात आणि नंतर या वड्या ते कोलकाता आणि इतर शहरात विकतात. यांवर ते चार जणांचे कुटुंब चालवतात.
“चिनीमाती खाणकामामुळे आम्हाला उत्पन्नाच्या संधी उपलब्ध झाल्या पण पर्यावरण आणि रस्त्यांची हानी झाली. धूळ सर्व घरांत येते आणि अन्नदेखील दूषित करते,” त्यांनी मोंगाबे-इंडियाला सांगितले.
स्थानिक लोक पाच सामान्य समस्यांबद्दल तक्रार करतात – श्वास घेण्यास त्रास होणे, खाणकामाच्या खड्ड्यांलगतच्या शेतजमिनीतील भूजल पातळी कमी होणे, पृष्ठभागावरील पाणी धुळीने दूषित होणे, धुळीच्या आवरणामुळे शेतजमीनीची सुपीकता गमाविणे आणि अवजड वाहनांमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा.
एकाहत्तर वर्षीय हरा कुमार गुप्ता यांचा मोठा मुलगा, पार्थ, कॅलसिनेशन प्लांटमध्ये सामान्य कामगार आहे आणि त्यांचा धाकटा मुलगा नोव्हेंबरमध्ये कामावर रुजू होणार आहे. ते म्हणाले की भूजल पातळीत घट झाल्याने आणि धुळीच्या आवरणामुळे स्थानिक तलावांमध्ये आता पूर्वीइतके मासे नाहीत आणि जवळपासच्या शेतजमिनींची सुपीकता कमी झाली आहे. “परंतु घराजवळ उत्पन्नाच्या संधी मिळत असल्याने आम्हाला हे नुकसान स्वीकारावे लागले. शेतीवर अवलंबून असलेल्यांपेक्षा या खाणींच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जास्त पक्की घरे आहेत,” हरा कुमार गुप्ता म्हणाले.
चिनीमाती वाहून नेणाऱ्या जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे खारियातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.
भाताच्या शेताशेजारील एक बंद पडलेली चिनीमातीची खाण. खारियातील शेतकरी खाणकामामुळे पाणी दूषित आणि शेत नापीक झाल्याचा मुद्दा अधोरेखित करतात. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.
माती खाणीतील यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्या गेल्या.
या क्षेत्रातील चिनीमाती खाणकामाच्या प्रस्तावांच्या ओझरत्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, प्रकल्पांमधून मिळणारा थेट रोजगार खूप जास्त नाही. उदाहरणार्थ, २०१९ मध्ये, पटेलनगर मिनरल्स अँड इंडस्ट्रीजने १३० एकर भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासाठी, ६० खाण कामगारांसह ७४ पूर्ण-वेळ कर्मचाऱ्यांची गरज उद्धृत केली.
सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयू) चे नेते अरुण मित्रा म्हणाले की, २००८ पर्यंत खरिया-कोमरपूर भागात त्यांची नोंदणीकृत युनियन कार्यरत होती जेव्हा अर्ध-यांत्रिकी खाणकाम सुरू झाल्यामुळे मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली.
शिवाय, काही स्थानिकांनी असा आरोप केला आहे की, खाण भाडेतत्त्वाच्या अटींनुसार, असे एक कलम आहे की ७.५-मीटरचा ठोस असा संरक्षित पट्टा भाडेतत्त्वाच्या सीमेवर वृक्षारोपणासाठी ठेवणे आवश्यक आहे आणि तिथे खनन केले जाणार नाही. या कलमाचे अनेकदा उल्लंघन केले जाते. जेव्हा अशा प्रकारे हरितपट्टा ठेवला जात नाही, तेव्हा इतर मालकांच्या शेजारील जमिनी भूजल स्त्रोत गमावितात आणि या जमिनी एकतर नापीक बनतात किंवा ढासळतात. त्या जमिनी खाणकामासाठी विकण्याशिवाय मालकांकडे दुसरा पर्याय उरत नाही.
चिनीमाती प्रक्रिया युनिटमधील एक कामगार. माती खाण क्षेत्रात कामगार संघटनांच्या अनुपस्थितीमुळे मजूर चांगले वेतन आणि फायद्यांसाठी वाटाघाटी करू शकत नाहीत. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.
२०१४ मध्ये, ”पटेलनगर, बीरभूममधील पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यांचे प्रभावी उपाय” या पत्रिकेमध्ये पश्चिम बंगालमधील रायगंज विद्यापीठात भूगोल विषयाचे विद्यमान सहायक प्राध्यापक प्रलोय मंडल यांनी लिहिले की, “आजूबाजूच्या सुपीक शेतजमिनीला धोका निर्माण झाला आहे” आणि या क्षेत्राला “जलविज्ञानविषयक समस्या, विस्कळीत भूस्वरूप, धूळ आणि वायू प्रदूषण, जल प्रदूषण, मातीची धूप आणि नैसर्गिक जलनिस्सारण पद्धतीवरील प्रभाव यांचा सामना करावा लागला.”
पटेलनगर येथील मोहम्मद बाजार ब्लॉक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना येथे श्वसनाचा त्रास असणारे रुग्ण तुलनेने जास्त प्रमाणात आढळतात का? असे विचारले असता त्यांनी काहीही उत्तर देण्यास नकार दिला.
पटेलनगर मिनरल्स प्रा. लि. ला प्रतिसादासाठी इमेल पाठविले होते, मात्र त्याचे अजूनही उत्तर आलेले नाही.
बॅनर प्रतिमा: खारिया, पश्चिम बंगालमध्ये रस्त्याच्या कडेला टाकलेल्या, खाणकामातून निघालेल्या चिनीमातीच्या ढिगाऱ्यावरून एक माणूस सायकलवरून जात आहे. सुभ्रजीत सेन यांनी टिपलेले छायाचित्र.
मूळ लेख: https://punaravartan.learnedstudio.com/?page_id=876#