Skip to content

मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात CPCB (Central Pollution Control Board) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन

कशाला परवानगी आहे आणि कशाला नाही

==========

पर्यावरणपूरक विसर्जन: CPCB कडून मार्गदर्शक तत्त्वे

साहित्य / उत्पादने

सुधारित मार्गदर्शक तत्त्वे गणेश मूर्तींच्या निर्मितीमध्ये आणि मूर्तींना सुशोभित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सजावटींमध्ये रासायनिक आणि विषारी पदार्थांच्या वापरास संबोधित करतात आणि त्यांचे नियमन करतात. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंग आणि एकदाच वापरता येतील अशा प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या सजावटीच्या वस्तूंवर बंदी आहे.

भागधारक (स्टेकहोल्डर्स)

ही मार्गदर्शक तत्त्वे मूर्तीकारांपासून ते संघटित गट, निवासी क्षेत्रे आणि बंदी लागू करण्याचा अधिकार असलेल्या अधिकार्‍यांपर्यंत अनेक भागधारकांना उद्देशून आहेत. मूर्तींचा आकार, पर्यावरणपूरक उत्सवासाठी आवश्यक असलेले नियोजन आणि नागरिकांकडून अपेक्षित असलेले सहकार्य आणि अनुपालन याबाबत ते शिफारशी देतात.

विसर्जन / विल्हेवाट

मार्गदर्शक तत्त्वांचे लक्ष्य हे मूर्तींचे विसर्जन कसे आणि कुठे करावे, ज्यामुळे नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये शक्य तितक्या प्रमाणात विसर्जन रोखले जाईल असे आहे. विशेषत: विसर्जनाच्या उद्देशाने बांधलेल्या तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या वापरण्यास प्रोत्साहन देणे, हा दस्तऐवजाचा मुख्य उद्देश आहे. विसर्जनातून बाहेर पडणाऱ्या गाळाचा पुनर्वापर करावा आणि पाण्याला निसर्गात परत सोडण्याआधी त्यावर प्रक्रिया करावी, असेही ते सुचवते.

==========

मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन (इकोएग्झिस्टद्वारे संकलित)

मूर्ती विसर्जनासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे:

(दि. १२ मे २०२० रोजी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (CPCB) प्रकाशित.)

मार्गदर्शक तत्त्वांविषयी

ही समालोचना दि. १२ मे २०२० रोजी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) मूर्ती विसर्जनासाठी प्रकाशित केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे दीर्घ अशा परिचर्चेचा परिणाम आहेत. याचा संदर्भ हा २००८ च्या जनहित मंच विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी आहे, ज्यामध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान मूर्ती विसर्जनाचे नियमन करण्यात आले होते. CPCB ने जून २०१० मध्ये “मूर्ती विसर्जनासाठी मार्गदर्शक तत्त्वे” प्रकाशित केली. तथापि, ती विषारी, अजैविक पदार्थांपासून बनवलेल्या मूर्तींना पाणवठ्यांमध्ये विल्हेवाट लावण्यापासून रोखण्यासाठी कुचकामी ठरली. त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी गणेश चतुर्थीला पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे, सीपीसीबीने मागील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याची निकड ओळखली आहे, हे एक चांगले लक्षण आहे.

विसर्जनाची आवश्यकता असलेल्या धार्मिक मूर्तींसाठी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांवर बंदी लादण्यात आली आहे आणि ती स्वागतार्ह आहे. आम्ही या कृतीचे पूर्ण समर्थन करतो आणि या बंदीची यशस्वी अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठीचे मुद्दे खाली मांडले आहेत.

बंदी मुख्यतः हिंदू सणांवर केंद्रित आहे – मोहरमच्या मुस्लिम सणाच्या दरम्यान विसर्जनासाठी त्यांच्या विधींच्या तपशीलासह आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांसह उपायांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

==========

व्याप्ती

सणांदरम्यान धार्मिक मूर्तींचे विसर्जन करण्यात सहभाग असलेल्या खालील भागधारकांना मार्गदर्शक तत्त्वे संबोधित करतात:

१. मूर्ती तयार करणारे मूर्तिकार किंवा कारागीर

२. पूजा आयोजन समित्या

३. स्थानिक आणि शहरी प्राधिकरण

४. नागरिक

५. राज्यांमध्ये राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे (SPCBs) आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रदूषण नियंत्रण समित्या (PCCs)

त्यामध्ये इतर गोष्टींसह खालील मुद्द्यांचा समावेश आहे:१. वापरलेले साहित्य

२. मूर्ती निर्मितीचे नियमन

३. विसर्जन प्रक्रिया आणि नियमन

४. घनकचरा आणि विसर्जनाच्या पाण्याची विल्हेवाट लावणे

==========

बंदीची वेळ

सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन अशा वेळी आले आहे जेव्हा २०२० च्या उत्सवासाठी मूर्तींची निर्मिती अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मागील वर्षांप्रमाणेच मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यास निवडलेल्या वेळेला मूर्ती निर्मात्यांनी विरोध केला आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, या तत्वांमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, त्यामुळे या तत्वांना स्थगिती मिळावी आणि ही स्थगिती पुन्हा मंजूर झाली आहे. त्यामुळे ज्यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे ते कारागिरांना प्लास्टर ऑफ पॅरिसमधून पर्यावरणपूरक पर्यायांकडे जाण्यासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी गणेशोत्सवानंतर लगेचच बंदी जाहीर करण्याच्या महत्त्वावर भर देतात.

शिवाय, विषारी, जैवविघटनशील नसलेल्या सामग्रीचा वापर आणि त्यांचे विसर्जन यावर बंदी घालण्यासाठी जनहित मंचाने दाखल केलेल्या जनहित याचिकेला सतरा वर्षे उलटून गेली आहेत. यादरम्यान, उत्सवामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे बहुमोल जलस्रोत कायमचे प्रदूषित झाले आहेत. सीपीसीबीने (CPCB) जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे तत्काळ अंमलात आणणे अत्यावश्यक आहे आणि यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

कोविड-१९ संकटादरम्यान भारतीयांना आपल्या पर्यावरणावरील मानवी हस्तक्षेपामुळे झालेल्या परिणामाची जाणीव झाली आहे. हे, विशेषतः मुळा-मुठा नदीसारख्या संपूर्ण भारतातील जलस्रोतांच्या गुणवत्तेत झालेल्या मूलगामी सुधारणांद्वारे दिसून आले आहे. त्यामुळे, टाळेबंदी संपल्यानंतरही अधिक जागरूक वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा योग्य मार्ग आहे.

==========

प्रतिबंध

कशाला परवानगी नाही?

१. मूर्ती बनविण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर

२. मूर्ती रंगविण्यासाठी विषारी आणि जैवविघटन न होणाऱ्या रासायनिक रंग/ऑइल पेंट्सचा वापर

३. सजावटीसाठी आणि प्रसाद वाटपासाठी एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोल साहित्याचा वापर

४. मूर्तींच्या आकाराचे नियमन

५. घनकचरा टाकणे किंवा जाळणे

६. सूट / सवलत

==========

कशाला परवनागी आहे?

१. जैवविघटन होणारे साहित्य

२. विसर्जनासाठी बांधलेल्या हौदात विसर्जन

३. नैसर्गिक पाणवठ्यामध्ये नियमन केलेले विसर्जन

==========

मार्गदर्शक तत्त्वांचे सुचवलेले शुद्धिकरण

पर्यावरणशास्त्र

साहित्य – मूर्ती

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालणे हे गणेश चतुर्थी सण अधिक पर्यावरणपूर्वक करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा प्रकारे मागील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पडलेली एक स्वागतार्ह भर आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस हा एक विघटन न होणारा मानवनिर्मित पदार्थ आहे जो सहजपणे विघटीत होत नाही आणि पर्यावरणात जिरवला जात नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी घातल्याने जलसाठे स्वच्छ राहतील याची खात्री होईल.

प्लास्टर ऑफ पॅरिसला मुख्य पर्याय म्हणून सध्या बाजारात उपलब्ध असलेले साहित्य  म्हणजे नैसर्गिक माती (शाडूमाती).

नैसर्गिक माती ही एक पुनर्वापर न होऊ शकणारे संसाधन आहे. पारंपारिकपणे, मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती स्थानिक स्त्रोतांकडून, तलावातील गाळापासून किंवा नदीकाठावरील मातीपासून घेतली जात असे. नंतर ती त्याच स्त्रोताकडे परत केली जात असे. बंदीमध्ये कच्च्या मालाचा स्त्रोत नमूद केला नाही आहे. उदा: नैसर्गिक माती संपादनाचा स्त्रोत / ती कुठून येते, खरेदी आणि हाताळणी यासंबंधीच्या सूचना दिल्या नाहीत.

तथापि मातीच्या मूर्तीचा उद्योग जसजसा वाढत गेला, तसतसे विशिष्ट गुणवत्तेची माती मिळविण्यासाठी विशिष्ट प्रदेशातून त्याचे उत्खनन करण्यात आले. जर प्रत्येकजण प्लास्टर ऑफ पॅरिसकडून नैसर्गिक मातीकडे वळला असेल, तर मूर्तींसाठी आवश्यक असलेल्या मातीमुळे तिचा बेसुमार आणि अनिर्बंध वापर होईल आणि आणखी एक पर्यावरणीय आपत्ती निर्माण होईल. माती उत्खनन करण्याच्या प्रक्रियेमुळे जवळपासचे जलस्त्रोत दूषित होण्याचा धोकाही निर्माण होतो.

याव्यतिरिक्त, पर्यावरणीय स्वयंसेवी संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे की, मोठ्या प्रमाणात विरघळलेल्या चिकणमातीमुळे नदीच्या तळाशी एक अभेद्य थर तयार होऊ शकतो ज्यामुळे त्याखालच्या सच्छिद्र खडकांतून पाणी झिरपू शकत नाही.

मूर्ती बनविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या साहित्यात नावीण्य आणणे आवश्यक आहे. “कारागीर किंवा कलाकार नाविण्यपूर्ण पध्दतींचा अवलंब करण्यास प्राधान्य देतात” हे वाक्य (पृ. ३) मूर्ती निर्मात्यांना अधिक टिकाऊ उत्पादन पद्धतीशी जुळवून घेण्याची निवड आणि संधी देते. प्रदूषण कमी करण्यासाठी नवकल्पना किंवा नवोन्मेषता (नवीन उपक्रम) हा केवळ प्राधान्याचा विषय न होता ते अनिवार्य केले पाहिजे.

शिफारशी

१. नैसर्गिक मातीचे उत्खनन ज्या परिसंस्थेतून होते त्यावर होत असलेला परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे आणि शाश्वत खाणकामासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करणे आवश्यक आहे.

२. आम्ही कागदाचा लगदा-डिंक (पेपर-मॅश) किंवा शेण यासारख्या पर्यावरणपूरक सामग्रीला अधिक व्यापक स्तरावर प्रोत्साहन द्यावे असे सुचवितो.

३. मार्गदर्शक तत्त्वामध्ये पुनर्वापर न होऊ शकणाऱ्या खनिज पदार्थांऐवजी पुनर्वापरयोग्य जैवविघटक सामग्रीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

४. नवनवीन जैवविघटनशील पदार्थ जसे की आळंबी (मशरूम) किंवा नारळाच्या काथ्यापासून बनलेल्या सामग्रीमध्ये संशोधन आणि विकासाला सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.

==========

मूर्तींचा आकार

पृष्ठ ४ वर, मार्गदर्शक तत्त्वे असे सांगतात की “शक्य असेल तितक्या कमी उंचीच्या आणि पर्यावरणपूरक मूर्ती […] पूजेसाठी वापराव्यात.” उंचीच्या निर्बंधांचे कोणतेही तपशील नाहीत. “कमी” हा शब्द व्यक्तिनिष्ठ आहे आणि त्यातून प्रत्येकजण वेगवेगळा आणि सोयीने अर्थ काढू शकतो. त्यामुळे त्या मूर्ती कुठल्या जलस्त्रोतात विसर्जित केल्या जातात यानुसार सीपीसीबीने मूर्तींची उंची आणि वजनाची श्रेणी संख्यात्मक रितीने नमूद केली पाहिजे.

शिफारशी

– वैयक्तिक आणि सार्वजनिक वापरासाठी विशिष्ट आकार मर्यादा सरकारने ठरवून दिल्या पाहिजेत.

– मूर्तीच्या छोट्या प्रतिकृतीचे विसर्जन या कल्पनेला प्रोत्साहन द्यायला हवे आणि पूजेसाठी एखादी कायमस्वरूपी मूर्ती असावी या कल्पनेचा विचार केला जावा.

==========

सामग्री – रंग

‘मूर्तींवर चकचकीत मुलामा (इनॅमल) आणि कृत्रिम रंग वापरण्याऐवजी पर्यावरणपूरक पाणी-आधारित, जैव-विघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंग वापरण्यास उद्युक्त केले पाहिजे.’ यामुळे नैसर्गिक रंग बनविणाऱ्या स्थानिक उद्योगधंद्यांनादेखील प्रोत्साहन मिळेल.

या कलमामुळे शिसे आणि कृत्रिम रंग असलेल्या मूर्तींच्या विसर्जनामुळे आपले पाणी आणि माती विषमुक्त राहतील, याची खात्री होते.

शिफारशी

पाण्यात विरघळणारा असल्याने कोणताही रंग विषारी नसतो असे नाही. हा फरक जनजागृती मोहिमेत स्पष्ट करावा लागेल.

हळुहळू लोकांनी मूर्तीच्या रंगकामात नैसर्गिक रंगद्रव्यांचाच वापर करण्यावर भर द्यावा वा अजिबात रंग देऊ नये.

ठराविक रंग कंपन्यांचे उत्पादन पर्यावरणपूरक असल्याचे किंवा विषारी नसल्याचे दावे सरकारने तपासणीतून सिद्ध करून मंजूर केले पाहिजेत.

==========

साहित्य: सजावट

मार्गदर्शक तत्त्वे नमूद करतात की,

‘एकदा वापरायचे प्लास्टिक आणि थर्माकोल साहित्य वापरण्यास काटेकोरपणे परवानगी दिली जाणार नाही आणि केवळ पर्यावरणास अनुकूल सामग्री.’ व

‘मूर्तींचे शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इ. आणि झाडांच्या नैसर्गिक डिंकाचा (रेझिन्सचा) वापर मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी चमकदार साहित्य म्हणून केला जाऊ शकतो.’

शिफारशी:

प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, शक्य तितक्या लवकर नियंत्रण सुरू करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी बनवलेल्या कोणत्याही विषारी, जैवविघटनशील नसलेल्या (नॉन-बायोडिग्रेडेबल) सजावट साहित्यावरील आणि रंगांवरील उत्पादन बंदी विचारात घेतली पाहिजे. प्लास्टिक, थर्माकोल साहित्य आणि कोणत्याही प्रकारच्या जैवविघटनशील नसलेल्या (नॉन-बायोडिग्रेडेबल) रासायनिक रंगांवरील बंदीसदेखील ही बाब लागू होते.

सजावट म्हणून “वेगवेगळ्या पक्ष्यांची पिसे” वापरण्यास परवानगी दिली जाऊ नये.

==========

विसर्जन

१. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये नैसर्गिक जलस्रोतांचे विसर्जन “अपरिहार्य” असण्याच्या शक्यतेचा दस्तऐवजात उल्लेख आहे – या कथनामुळे दस्तऐवजात एक पळवाट निर्माण होते आणि अपवाद करण्याची मुभा मिळेल. असंदिग्धता कमी करण्यासाठी “अपरिहार्य” परिस्थिती म्हणजे नक्की काय हे ठळकपणे स्पष्ट करणे गरजेचे आहे.

२. सध्या, “शक्य होईल तितके, पाणवठ्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी, सर्व रहिवासी कल्याणकारी संघटनांना किंवा वैयक्तिक कुटुंबांना […] तात्पुरते तलाव/टाक्या […]] आणि सार्वजनिक अशा तात्पुरत्या/कृत्रिम तलाव / टाक्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सहभागी व्हावे”, असे सांगून मार्गदर्शक तत्त्वे अजूनही नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये विसर्जन करण्यास वाव देतात. परिणामी, लोक कृत्रिम टाक्या वापरण्यास नकार देऊ शकतात. त्यामुळे खुल्या नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यास स्पष्टपणे बंदी घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

३. जनतेला पाणवठ्यांमध्ये पारंपारिक विसर्जन न करता, त्याऐवजी घरीच प्रतिकात्मक विसर्जन करण्यास उद्युक्त करणे, हे प्रथम प्राधान्य असले पाहिजे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वर्णन केलेले विसर्जन शुल्क याबाबत चांगली संधी देते. तथापि, अद्याप त्याचे योग्य वर्णन केलेले नाही. “नियुक्त मूर्ती विसर्जन स्थळावरील कचरा साफ करण्यासाठी एजन्सी नियुक्ती / आउटसोर्सिंगचे शुल्क प्रत्येक नागरिकाकडून किंवा समुदायाकडून विसर्जन शुल्क म्हणून वसूल केले जावे” असे सांगून (पृ. १२), मार्गदर्शक तत्त्वे सूचित करतात की, हे शुल्क सामान्य कर म्हणून आकारले जाईल. हे स्वत:च्या घरात विसर्जन करणाऱ्या लोकांसाठी अन्यायकारक सिद्ध होईल.  त्याऐवजी, विसर्जन केंद्रावर थेट शुल्क आकारले जावे, अशा प्रकारे जलकुंभांवर विसर्जन कमी होईल.

४. या बंदीमध्ये असे म्हटले आहे की ‘नद्या, जलाशय किंवा तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करणे अपरिहार्य असेल, तर नियुक्त ठिकाण (योग्य दृष्टीकोन, प्रवेश, नदी / तलाव / तलावाचा कोपरा भाग जिथे नदीच्या किंवा तलावाच्या पाण्याची पातळी उथळ आहे असे स्थळ) शोधले पाहिजे’… यामुळे पाणवठ्यांचे रक्षण करण्याच्या हेतू निष्प्रभ होतो – तलावाच्या कोपऱ्यात विसर्जित करणे हे तलावामध्येच विसर्जन करण्यासारखे आहे कारण दूषित पाणी तलावात मिसळण्यापासून रोखणे अशक्य आहे.

५. मार्गदर्शक तत्त्वे समुद्रात विसर्जनाच्या शक्यतेस वाव देतात आणि समुद्रात विसर्जन करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत सल्ला देतात. तथापि, आपण नदी, तलाव आणि विहिरींचे संरक्षण करत असताना समुद्र आणि महासागरदेखील मानवनिर्मित वस्तू आणि वस्तूंपासून मुक्त राहतील, याची खात्री करणे तितकेच महत्त्वाचे आहे. समुद्रात विसर्जनावर पूर्ण बंदी घालून, मार्गदर्शक तत्त्वे हे सुनिश्चित करतील की आपण सागरी प्रदूषणदेखील कमी करू.

शिफारशी

१. नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये विसर्जनासाठी नेमक्या कोणत्या परिस्थिती ‘अपरिहार्य’ मानल्या जातात ते निर्दिष्ट करावे.

२. नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये विसर्जन करण्यास स्पष्टपणे बंदी घालावी आणि पर्यायांच्या विकासास प्रोत्साहन द्यावे.

३. विसर्जन शुल्क लागू करण्याबाबत आणखी स्पष्टीकरण द्यावे.

४. नैसर्गिक पाणवठ्यांच्या एका कोपऱ्यात विसर्जन होण्याची शक्यता निकालात काढावी.

५. समुद्रात विसर्जन करण्यास पूर्णपणे बंदी घालावी.

६. विसर्जन पूर्ण झाल्यानंतर, विसर्जन टाक्या / तळ्यांतील पाणी तुरटीसारखी किलाटक (कोअ‍ॅग्युलंटस) वापरून स्वच्छ केले पाहिजे. सुपरनॅटंट द्रव्य एसटीपीला पाठवावे आणि गाळ योग्य लँडफिल साइटवर टाकला जाऊ शकतो. विसर्जन टाक्यांमधून काहीही नद्यांमध्ये जाऊ शकत नाही.

७. ताझिया विसर्जन, “गणेशोत्सवासाठी नमूद करण्यात आलेले खालील सर्व नियम व मार्गदर्शक सूचना” समाविष्ट करा.

८.  उत्सवातील सर्व दिवसांसाठी ULB ने कंपोस्टिंगसाठी फुले टाकण्याची वेगळी व्यवस्था करावी. शहरातील घन कचऱ्यामध्ये फुले समाविष्ट करु नयेत.

नैसर्गिक तलाव/तळी किंवा इतर जलक्षेत्रांमधील विसर्जनासाठी ULB ने तज्ञांची मदत घेऊन जलाशयाचा आकार आणि त्यातील पाण्याची पातळी ह्यावर त्यात विसर्जित होणाऱ्या मूर्तींची संख्या निश्चित करावी.

==========

शासनपद्धती

विसर्जनाच्या सुव्यवस्थापनाचे नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये अनेक पायऱ्यांचा उल्लेख केला आहे.

१. ULB मध्ये कारागीरांची‌ नोंदणी –प्रतिबंधाचे पालन न केल्यास परवाना रद्द करण्यात येईल.

२. मोठ्या मूर्ती बनवणाऱ्यांसाठी अनामत –अनामतीचा भुर्दंड.

३. नागरिकांसाठी विसर्जनासाठी आकारण्यात येणारे शुल्क.

४. नद्या आणि नैसर्गिक जलक्षेत्रांना तात्पुरत्या स्वरुपातील संरक्षित करणे.

५. मोठ्या कार्यक्रमांच्या व्यवस्थापनेचा आराखडा उत्सवाच्या आधी प्रस्तुत करणे.

६. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जागीच दंड करणे.

७. “पूजा आयोजित करणाऱ्या समित्यांनी (किंवा मंडळांनी) संबंधित ULB कडून किमान एक महिना आधी परवानगी घ्यावी.” (पृ. ४) ह्या वाक्यातील अस्पष्टता किंवा संभ्रम टाळण्यासाठी संबंधित विशिष्ट अधिकाऱ्यांचे नाव स्पष्टपणे देण्यात यावे.

८. कारागीर आणि शिल्पकारांना स्वतः:ची नोंदणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिबंधात नमूद केले आहे. त्यामुळे नोंदणीकृत कारागीरांची यादी जाहीर करावी लागेल. तसेच पत्रकात वितरकांच्या नोंदणीबाबत उल्लेख नाही. त्याचबरोबर उत्पादक आणि वापरकर्ते अशा एकंदरीतच पुरवठा साखळीचे नियमन करावे लागेल.

९. वैयक्तिक आणि गटांसाठीचे विसर्जन शुल्क, तसेच ह्या शुल्कांचा वापर आणि नियंत्रण ह्याचा तपशीलवार खुलासा नाही. ‘विसर्जन शुल्क’प्रत्येक नागरिकाकडून किंवा संघटनांकडून घेतले जाईल, असे नमूद केले आहे. स्वतः:च्याच घरात विसर्जन करणाऱ्या लोकांसाठी हा नियम अनुचित ठरेल. विसर्जनाच्या ठिकाणी मूर्ती विसर्जन करायला येणाऱ्या लोकांकडूनच हे शुल्क आकारले जावे.  ह्यामुळे जलक्षेत्रांकडे येण्यापासून लोक परावृत्त होतील.

शिफारशी

– उत्पादकांपासून ते वितरकांपर्यंत आणि अंतिम वापरकर्ते  या संपूर्ण उत्पादन साखळीची नियमावली स्पष्ट करणे.

– अहवाल देण्यासाठी नेमके अधिकारी निर्दिष्ट करा.

– विसर्जन शुल्काच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता देणे.

==========

विल्हेवाट

१. “केवळ पुनर्प्रक्रिया न करता येण्याजोग्या/जैव-अविघटनीय/पुनर्प्राप्ती न होण्याजोग्या अशाच घटकांची विल्हेवाट स्थानिक अथवा शहरी संस्थांकडून सॅनिटरी लॅंडफिलमध्ये लावण्यात यावी” (पृ. ९) हे वाक्य अकार्बनिक घटकांच्या वापराबद्दल त्रुटी दर्शविते आणि त्यामुळे प्रतिबंधाच्या मध्यवर्ती संकल्पनेला तडा जातो. ह्या सर्व घटकांची/सामग्रीची स्पष्ट सूची देण्यात यावी तसेच त्यांच्या वापराला कोणत्या परिस्थितीत परवानगी द्यावी, याबाबत स्पष्टता असावी.  तरीही, ULB नी त्यांच्या वापरापासून स्पष्टपणे परावृत्त केले पाहिजे.

२. खरे तर, विसर्जनासाठी बांधण्यात येत असलेल्या टाक्यांची जागा आणि क्षमता त्यांचा विसर्जनासाठी वापर करणाऱ्या भक्तांच्या प्रमाणात असावी. लोकांच्या सार्वजनिक विसर्जन हौदांवर येण्याच्या संख्येला आळा घालण्यासाठी आणि त्यांना घरातच विसर्जन करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विसर्जन शुल्क हा चांगला मार्ग आहे.

३. उत्सवांमध्ये सुशोभीकरण आणि अर्पण केल्या जाणाऱ्या गोष्टी यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होते. ह्या कचऱ्याच्या प्रमाणभूत (किंवा पद्धतशीर) व्यवस्थापनेचा अभाव आहे. ह्या कचऱ्यामध्ये फुले कपड्यांपासून ते अगदी कागद, प्लास्टिक, थर्मोकोल सुशोभीकरण इत्यादी पुनर्प्रक्रिया करण्याजोग्या आणि जैव-विघटक सामग्रीचा समावेश असतो. निर्माल्यामध्ये आढळून येणाऱ्या सर्व घटकांची स्पष्ट सूची करणे गरजेचे आहे.

शिफारशी

– कचरा भरणा जमिनीवर कचरा फेकण्याच्या अपरिहार्यतेचा मुद्दा काढून टाकण्यात यावा.  त्यामुळे उत्सवांशी संबंधित कचरा फेकण्याच्या क्रियेला आळा बसेल.

– घनकचऱ्याच्या पुनर्वापरासाठी आणि पुनर्प्रक्रियेसाठी संभाव्य विकल्प स्पष्ट करा.

– आयोजक समित्यांकडून अपेक्षित असलेला व्यवस्थापनाच्या आराखड्याचा नमुना तयार करा.

==========

प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून सनियंत्रण (देखरेख) आणि अंमलबजावणी

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांनी आखून दिलेल्या उपाययोजनांच्या प्रभावीपणाबाबत सनियंत्रणासाठी आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या बाबी मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टपणे सांगितल्या आहेत.

विसर्जन टाक्यांमधील पाणी नैसर्गिक जलप्रवाहात सोडण्यापूर्वी त्यांची चाचणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांमध्ये शिफारस करण्यात आली आहे. हा दहा दिवसांचा गणेशोत्सव जसजसा पुढे जातो तसतसे १, ३, ५, ७ आणि १० व्या दिवशी विसर्जन होते. प्रत्येकवेळी भाविकांची गर्दी वाढत जाते. विसर्जनाच्या भरलेल्या टाक्या रिकाम्या करणे आणि पुढच्या दिवशीच्या विसर्जनासाठी त्यांना तयार करणे याकरिता मिळणाऱ्या कमी वेळेमध्ये पाण्याच्या गुणवत्तेचे पद्धतशीरपणे सनियंत्रण करणे शक्य होणार नाही.

==========

उदरनिर्वाह

या वस्तूंच्या उत्पादनावर आणि विक्रीवर कारागिरांचा मोठा समुदाय अवलंबून असल्यामुळे या मार्गदर्शक सूचनांचा त्या समुदायांच्या उदरनिर्वाहावर नक्कीच परिणाम होणार आहे.

कारागिरांना बसणारा संभाव्य फटका मर्यादित ठेवण्यासाठी त्यांनी पीओपीऐवजी जैवविघटनशील साहित्यापासून मूर्ती बनवायच्या झाल्यास त्यामध्ये येणारी आव्हाने शासनाने समजावून घेणे अतिशय महत्वाचे आहे. कारागिरांना आवश्यक साहाय्य पुरविल्यास सदरच्या बंदीची अंमलबजावणी आणखी प्रभावीपणे करता येईल.

१. कच्च्या मालाची पूर्तता

२. मजूर आणि यांत्रिकीकरण

३. नुकसान, जोखीम आणि शिल्लक साठा

४. मान्सून

५. बाजारपेठा

६. कौशल्य विकास

७. संशोधन आणि विकास

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी पर्यावरणाच्या दृष्टीने जरी फायद्याची असली तरी यामुळे मूर्तिकारांची उपजीविका धोक्यात येऊ शकते. मातीच्या मूर्तींचे उत्पादन करण्यासाठी अधिक कौशल्यपूर्ण कारागिरांची आवश्यकता असल्याने कदाचित सध्याच्या अनेक मूर्तिकारांना या उद्योगक्षेत्रात पुढे काम करणे अशक्य होईल. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन मातीच्या मूर्तीकारांच्या सहयोगाने पुनर्प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. अशा प्रकारे पीओपी मूर्तिकारांना भविष्यात रोजगाराचे साधन मिळेल आणि त्यासोबतच आपल्याला मातीच्या मूर्तींसाठीची वाढती मागणी पूर्ण करता येईल.

प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या मूर्ती बनविण्याने दीर्घकालीन लाभ होतील कारण मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी अतिशय कलाकुसरीने व कौशल्याने काम करणाऱ्या कारागिरांची आवश्यकता असल्याने पुनर्प्रशिक्षणाची मोहीम यशस्वीपणे पार पडल्यानंतर रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

==========

व्यापाराचे अर्थशास्त्र – वर्तुळाकार अर्थव्यवस्था

मातीच्या मूर्तींसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे होणारे संभाव्य उत्खनन कमी करण्यासाठी मूर्तिकारांना गेल्या वर्षीच्या मूर्तींच्या मातीचा पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि तसे केल्यास त्यांना लाभ देण्यात यावेत. हे साध्य करण्यासाठी गाळापासून मूर्तींकरिता वापरता येण्याजोगी माती तयार करण्यासाठी शासकीय किंवा खाजगी माल पुरविणाऱ्या आणि मध्यस्थ संस्थांची निर्मिती केली पाहिजे. नव्याने तयार केलेल्या मातीच्या बाजारभावापेक्षा अशा प्रकारच्या पुनर्वापरातून तयार केलेल्या मातीची किंमत कमी ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले पाहिजे. तसेच अशा प्रकारे पुनर्वापरातून तयार केलेली माती अधिक प्रमाणात शिल्लक राहिल्यास बाकीच्या उद्योगसमूहांनाही ती उपलब्ध करून दिली पाहिजे.

मूर्ती उत्पादनाचा विचार करता कचरानिर्मितीच्या संपूर्ण उच्चाटनाचा प्रयत्न आणि त्याचसोबत बाकीच्या क्षेत्रातील सेंद्रिय कचऱ्याची पुनर्निर्मिती हे ध्येय असले पाहिजे. मातीच्या मूर्तीऐवजी गायीच्या शेणासारख्या पर्यायी कच्च्या मालापासून मूर्ती बनविण्याचे शाश्वत पर्याय निर्माण करण्यासाठी अनुभवी मूर्तिकारांना पाचारण केले पाहिजे.

शिफारशी

१. अधिकाधिक मातीचे उत्खनन रोखण्यासाठी पुढील वर्षासाठी गाळाचे रूपांतर मूर्तींकरिता वापरता येण्याजोगी मातीमध्ये करण्यासाठी संबंधित माल पुरविणाऱ्या आणि मध्यस्थ संस्थांची निर्मिती करण्यात यावी. तयार झालेला गाळ दुसऱ्या एखाद्या उद्योगक्षेत्रासाठी कच्चा माल बनू शकतो किंवा त्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा माती म्हणून पुनर्वापर करता येऊ शकतो. यासाठी महानगरपालिका विभागाला किंवा एखाद्या खाजगी कंत्राटदाराला नियुक्त करता येऊ शकते. यामुळे रोजगारात वाढ होईल आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था साध्य करण्यास मदतही होईल.

२. अशी पुनर्वापरातून तयार केलेली माती मूर्तिकारांना अर्ध्या किंमतीत देऊन त्यांना तिच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे मातीचे चक्र पूर्ण होईल आणि विनियोग प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. नवीनवताजी माती महाग आहे. मात्र मूर्तिकारांनी पुनर्वापरातून मिळविलेली माती वापरल्यास अंततः कच्च्या मालाची किंमत कमी होईल आणि मूर्तींसाठी होणारा खर्चही कमी होईल. सदरचे पुनर्वापराचे केंद्र खाजगी किंवा शासकीय उपक्रम/हस्तक्षेप असू शकेल.

==========

श्रद्धा आणि परंपरा

ब्रिटिश राजवटीत भारताचे सांस्कृतिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी श्री बाळ गंगाधर टिळकांनी लोकांना गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास चालना दिली. पारंपरिक विधिकर्मांमधून एखादा व्यापक सामाजिक संदेश देणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी अशा प्रकारचे उत्सव माध्यम बनले पाहिजेत.

आपली जलस्थळे आणि पर्यावरण, शुद्ध व निरामय ठेवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन धार्मिक गटांनी, तसेच धर्मगुरूंनी व अध्यात्मिक गुरूंनी उत्सवांचे किंवा सणांचे अशा प्रकारचे नियमन समजूतदारपणे स्वीकारले पाहिजे.

काही ठराविक धार्मिक गटांनी मूर्तींचे वाहत्या पाण्याऐवजी घरामध्ये बादलीत विसर्जन करण्यास आक्षेप घेतला आहे.

आणखी काही गटांनी विसर्जनाचा विधी झाल्यानंतर मूर्तींच्या पुनर्वापराच्या संकल्पनेला प्रतिकार केला आहे.

जैवविघटनशील घटकांपासून बनविण्यात येणाऱ्या मूर्ती तुलनेने नाजूक असतात आणि त्या हाताळताना मूर्तीस तडे जाण्याची किंवा तिचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे एखाद्या भंगलेल्या किंवा किरकोळ प्रमाणात नुकसान झालेल्या मूर्तीची पूजा करणे कोणत्याही कुटुंबांसाठी जाचक व क्लेशदायी ठरू शकते, या धारणेमुळे काही धार्मिक गटांनी अशा जैवविघटनशील मूर्तींना विरोध दर्शविला आहे.

आपल्या उत्सवांना व सणांना आपल्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणारे आणि नैसर्गिक संपन्नता साजरे करणारे सोहळे करण्यासाठी अशा प्रकारच्या धोरणांचा आढावा घेणे आणि त्यांचा व्यापक प्रकारे पुनर्विचार करणे गरजेचे आहे. मानवजातीच्या निरामय भविष्यासाठी उत्सवांच्या साजरा करण्यातील अशा बदलांचे धार्मिक गटांकडून आणि धर्मगुरुंकडून समर्थन होणे अतिशय महत्वाचे असेल.

==========

समुदायांमध्ये जागरूकता

बंदीला चालना आणि त्याबाबत संवाद

बनावट पर्यावरणपूरक मूर्तींबाबत जागरूकता निर्माण करण्यात यावी. लोकांना बाजारातील बनावट व अस्सल मूर्ती यातील भेद ओळखता येण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या साहाय्याने MPCB ने किंवा तत्सम सक्षम शासकीय संस्थेने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक सूचना लोकांना उपलब्ध करून देण्यात याव्यात.

==========

पर्याय – आगामी वाटचाल

१. या बंदीतून काही पर्यायी उपाययोजना समोर येताहेत. कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या चांगल्या आणि पर्यायी कच्च्या मालाच्या वापराबद्दल उपाययोजना योजून बघितल्या पाहिजेत.

२. श्रद्धा आणि परंपरा –लोकमान्य टिळकांनी सामुदायिकरित्या सण साजरे व्हावेत आणि जनतेमध्ये एकतेची व बंधुभावाची भावना विकसित व्हावी, यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. महामारीच्या काळात सामुदायिक संमेलन शक्य नसताना ऑनलाईन/व्हर्च्युअल दर्शनच पर्याय विचारात घेता येऊ शकतो.

३. कचराविरहित गणपतीची आदर्श परिस्थिती.

४. समकालीन कलाकारांनी हस्तक्षेप करून नवनवीन साहित्य आणि पुन:कौशल्य याबाबत आमूलाग्र बदलात्मक पर्याय शोधावेत.

==========

– इकोएग्झिस्ट, पुणे

– ऑयकॉस, पुणे

– इकोलॉजिकल सोसायटी, पुणे

यांनी स्वाक्षरी केली !

मराठी