Skip to content

पांढऱ्या मातीच्या काळ्या जगात स्निग्धेंदू भट्टाचार्य आणि सुभ्रजीत सेन द्वारा २४ सप्टेंबर २०२१ रोजी

Mongabay - Photo 1

– जरी खाणकाम आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया यांमुळे पर्यावरण, मानवी आरोग्य आणि कामगारांचे हक्क यांवर होणाऱ्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उभे राहत असले तरीही पश्चिम बंगाल मध्ये कॅओलिन किंवा चिनीमाती हे फारसे न वापरले जाणारे / अप्रचलित खनिज संसाधन आहे.

– पश्चिम बंगालमधील बीरभूमसारख्या जिल्ह्यांमध्ये अनेक दशकांपासून मातीचे उत्खनन केले जात असले तरी, पर्यावरण आणि लोकांचे संरक्षण निश्चित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना न करता ते सुरूच ठेवले आहे.

– स्थानिक समुदाय आरोग्य, पाणी आणि शेतजमिनीवरील परिणामांबद्दल तक्रार करतात परंतु खाण क्षेत्र त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार देते म्हणून त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यास भाग पाडले जाते.

पाच जणांच्या कुटुंबाची जबाबदारी असणारा राबी बागडी नावाचा साधारण पस्तिशीचा एक पुरुष पश्चिम बंगालमधील कबिलपूर गावात आपल्या घरातून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या खोरिया येथील ‘चायना क्ले’ ग्राइंडिंग युनिटमध्ये कामासाठी स्वच्छ कपडे घालून बाहेर पडतो. तो चेहरा, केस, शरीर आणि कपडे पांढऱ्या पावडरच्या थराने माखलेल्या अवस्थेत घरी परततो.

त्याला कामावरील वातावरण, रोजगाराचे फायदे किंवा आरोग्यावरील परिणाम यांविषयी विचारले असता तो बुचकळ्यात पडलेला आणि बोलण्यास अनुत्सुक दिसला. ग्राइंडिंग युनिट मधील पल्वरायझर मशीन, त्यातून बाहेर पडणारा पांढऱ्या भुकटीचा विरळ असा ढग, चिखलाने भरलेला आणि निसरडा असा आवाराच्या बाहेरील रस्ता अशा अनिष्ट पार्श्वभूमीवर दिसणारी बागडीची अशक्त अशी ही अंगयष्टी.

जे लोक बागडीला ओळखतात त्यांच्या मते बागडी हा एक सामान्य मजूर आहे ज्याला दिवसाला आठ तासांची पाळी करून १८० रुपये मिळतात. जरी सरकारी नियमाप्रमाणे अकुशल कामगाराला दिवसाला २९६ रुपये इतके किमान वेतन देणे बंधनकारक आहे. तरीही, बागडीने या विषयावर कोणतेही मत देण्यास नकार दिला. वास्तविक, तो ज्या विभागात (युनिटमध्ये) काम करतो तिथे कामगारांची संघटनासुद्धा नाही. ते सगळे बहुतेक प्रासंगिक/सामान्य कामगार आहेत आणि म्हणून त्यांना कोणतेही संरक्षण आणि भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीसारखे फायदे मिळत नाहीत.

हे ग्राइंडिंग युनिट १९५५ साली स्थापना केलेल्या आणि भारतातील सर्वात जुन्या चायना क्ले मायनिंग आणि प्रोसेसिंग युनिट्सपैकी एक असलेल्या पटेलनगर मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेडचाच एक भाग आहे. २०१२-१३ मध्ये देशातील टॉप १० कॅओलिन उत्पादकांच्या यादीत समाविष्ट असलेले हे राज्यातील एकमेव युनिट आहे.

खणून काढलेल्या चिनीमातीपासून बनवलेले चिनीमातीचे ठोकळे (केक) पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील प्रोसेसिंग युनिटमधून वितरित करण्यासाठी तयार आहेत. हे खनिज काही आवश्यक वस्तूंच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. सिमेंट, सिरॅमिक, प्लास्टिक, रंग आणि बरेच काही. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.

खणून काढलेल्या चिनीमातीपासून बनवलेले चिनीमातीचे ठोकळे (केक) पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील प्रोसेसिंग युनिटमधून वितरित करण्यासाठी तयार आहेत. हे खनिज काही आवश्यक वस्तूंच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. सिमेंट, सिरॅमिक, प्लास्टिक, रंग आणि बरेच काही. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.

चिनीमाती किंवा कॅओलिन, ज्याला पांढरी चिकणमातीदेखील म्हणतात या गोष्टी कच्च्या आणि प्रक्रिया केलेल्या स्वरूपात सिमेंट, रबर, कागद, सिरॅमिक, काच, रंगआणि प्लास्टिक यांसारख्या विविध उद्योगांमध्ये वापरल्या जातात. प्रत्येक उद्योगाला वेगवेगळ्या दर्जाच्या चिनीमातीची आवश्यकता असते. पश्‍चिम बंगालमध्ये भारतातील कॅओलिन साठ्यापैकी अंदाजे एक षष्ठांश साठा आहे; परंतु, २०१०-११, २०११-१२ आणि २०१२-१३ या कालावधीत भारताच्या एकूण कॅओलिन उत्पादनापैकी पश्चिम बंगालचा वाटा केवळ २.९२ टक्के इतकाच होता. ही स्थिती १९९० च्या दशकाच्या तुलनेत विरोधाभासी आहे कारण त्या काळी -१९९०-९१ आणि १९९८-९९ या नऊ वर्षांमध्ये भारताच्या एकूण ६.६ दशलक्ष टन कॅओलिन उत्पादनापैकी राज्याचा वाटा ०.९८ दशलक्ष टन किंवा १४.७२ टक्के इतका होता. साहजिकच, बंगाल मागे पडल्याने गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ पुढे गेले.

पश्चिम बंगालमधील उद्योग बीरभूम जिल्ह्यात केंद्रित आहेत ज्याच्या केंद्रस्थानी मोहम्मद बाजार समुदाय विकास गट आहे. बीरभूम जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेल्या खोरीया (किंवा खारिया) या गावाला त्याचे नाव ‘खोरी’ या शब्दापासून मिळाले आहे. चिनीमातीला स्थानिक लोक ‘खोरी’ असे म्हणतात.

मोहम्मद बाजारमध्ये सतरा पल्व्हरायझर मशीन कार्यरत आहेत, त्यापैकी बहुतेक खोरिया आणि कोमरपूर या गावांमध्ये आहेत. या भागात विवृत (उघड्या जमिनीलगत) चिनीमाती खाणकामासाठी मोठे खड्डेही खोदलेले आहेत. पटेलनगर मिनरल्स अँड इंडस्ट्रीज प्रा.लि. या एकट्या कंपनीकडे २२८ एकर क्षेत्र व्यापणारे किमान चार खाण पट्टे आहेत, तर त्याच्याशी संबंधित युनिट्स, N.P. मिनरल्स आणि पटेलनगर रिफ्रॅक्टरीज प्रा. लि. या कंपन्या २०१७ मध्ये कार्यान्वित झालेल्या कॅल्सिनेशन युनिटसह अजून अनेक खाण आणि प्रक्रिया युनिट्स चालवितात. हा गट घोष कुटुंबाच्या मालकीचा आहे, ज्यात दोन आमदारही आहेत – १९७२-७७ मध्ये काँग्रेस पक्षाचे निताई पाडा घोष आणि २०११-१६ या कालावधीत तृणमूल काँग्रेस पक्षाकडून त्यांचा मुलगा – स्वपन कांती घोष.

कामगार बहुतेक १८-४५ वयोगटातील आहेत आणि ते या दोन गावांसह शेजारच्या मालदिहा, गणेशपूर, मोहम्मद बाजार, राज्यधरपूर, कबिलपूर आणि अंगारगारियामधील आहेत. बहुसंख्य कामगार हे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) समुदायातील आहेत. पावसाळ्यात खाणकाम आणि धुलाईची कामे बहुतेक बंद असतात परंतु ग्राइंडिंग युनिट्सचे काम प्रत्येकी आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये अखंड चालू असते. प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येक पाळीमध्ये १२-१५ लोक काम करतात.

N.P. मिनरलच्या १७.८४ एकर जमिनीवरील (खोरीया गावातील) खाणकामाच्या प्रस्तावानुसार, “सर्व मार्गदर्शक मानके (प्रमाणं) साध्य करण्यासाठी, सर्व धूळ तयार करणाऱ्या क्षेत्रात धूळ शोषून घेणारी यंत्रणा बसवण्यात येईल ज्यायोगे उडणारी धूळ ही खाणीबाहेर जाणार नाही.” त्यात असेही म्हटले आहे की,“स्थानिक जलस्रोतांवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून जलप्रदूषण कमी करण्यासाठी शून्य विसर्जनाचा प्रयत्न केला जाईल.”

स्वतःचे नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा असणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याने असे म्हटले की, सर्व खाण आणि प्रक्रिया युनिट्सने समान उपाययोजना करणे आवश्यक आहे. पण मोंगाबे-इंडियाला भेटीदरम्यान धुळीने माखलेले रस्ते आणि शेते दिसली. औद्योगिक क्षेत्राच्या पलीकडे असलेल्या घरांच्या आतही धूळ होती. ग्रामस्थांनी सांडपाणी गळतीमुळे स्थानिक जलक्षेत्रे दूषित होत असल्याच्या तक्रारी केल्या.

क्ले मायनिंग प्रोसेसिंग युनिटमधून येणारी चिनीमातीची धूळ. रहिवासी आणि कामगार अतिरिक्त धुळीमुळे श्वासोच्छवासाचा त्रास आणि पाणी दूषित झाल्याची तक्रार करतात. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.

क्ले मायनिंग प्रोसेसिंग युनिटमधून येणारी चिनीमातीची धूळ. रहिवासी आणि कामगार अतिरिक्त धुळीमुळे श्वासोच्छवासाचा त्रास आणि पाणी दूषित झाल्याची तक्रार करतात. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.

पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील विवृत (ओपन कास्ट) खाणींमधून चिनीमाती उत्खनन केली जाते. राज्यामध्ये संपूर्ण भारतातील चिनीमाती किंवा कॅओलिनचा १४% साठा आहे परंतु हा उद्योग अजूनही मोठ्या प्रमाणात केला जात नाही. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.

पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील विवृत (ओपन कास्ट) खाणींमधून चिनीमाती उत्खनन केली जाते. राज्यामध्ये संपूर्ण भारतातील चिनीमाती किंवा कॅओलिनचा १४% साठा आहे परंतु हा उद्योग अजूनही मोठ्या प्रमाणात केला जात नाही. सुभ्रजीत सेन यांनी काढलेले छायाचित्र.

“आम्हाला दररोज आमच्या घरातून मातीच्या धूळीचे थर साफ करावे लागतात. मलाही श्वास घेण्यास त्रास होत आहे,” असे खारिया येथील रहिवासी दुलाल चंद्र मंडल यांनी सांगितले.

त्यांनी कधी कोणत्याही प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे का असे विचारले असता मंडल म्हणाले, “कोणाकडे तक्रार करायची? मला कोणाकडून काही सहकार्य मिळेल का? या युनिट्समधून जे फायदा कमावितात  माझा त्यांनाच विरोध आहे.”

राज्य पर्यावरण विभाग आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी मुख्य कायदा अधिकारी विश्वजित मुखर्जी यांच्या मते, चिनीमातीच्या खाण क्षेत्रात ‘आदिम शोषण व्यवस्था’ चालते. “पर्यावरणावर होणारे परिणाम आणि कामगारांच्या हक्कांची कोणीही पर्वा करत नाही. तेथे पर्यावरण संरक्षण आणि कामगारांच्या हक्कांशी संबंधित कोणताही कायदा लागू होत नाही,” असे त्यांनी मोंगाबे-इंडियाला सांगितले.

English